अजब दावा ! “पेट्रोल आणि डिझेलचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढले, त्याच प्रमाणात लोकांच्या उत्पन्नातही वाढ”

भाजपच्या मंत्र्यांचे सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य

भोपाळ : देशात एकीकडे सर्वसामान्य जनता पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे हैराण आहे. तर दुसरीकडे भाजपच्या एका खासदाराने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. भाजपचे खासदार महेंद्रसिंग सोलंकी यांनी, जर पेट्रोलचे दर वाढत असतील तर त्याच प्रमाणात लोकांचे उत्पन्नही वाढले असल्याचा अजब दावा केला आहे. इतकेच नव्हे तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीचं खापर सोलंकी यांनी 55 वर्षांच्या कॉंग्रेसच्या राजवटीवर फोडले आहे.

भाजप खासदार सोलंकी यांनी केलेल्या या दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढले आहे, त्याच प्रमाणात लोकांचे उत्पन्नही वाढले आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच एकट्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये पेट्रोलचे दर वाढलेले नाहीत. या देशाचे दुर्दैव हे आहे की 55 वर्ष येथे कॉंग्रेस सरकारने राज्य केले. त्यांनी येथे अशी कोणतीही पायाभूत सुविधा निर्माण केलेली नाहीत, ज्यामुळे या किंमती वाढण्यास प्रतिबंध होईल. परंतु नरेंद्र मोदी यांचे सरकार या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 89.54 रुपयांवर पोहोचली आहे आणि एक लिटर डिझेलची किंमत 79.95 रुपयांवर पोहोचली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे.

श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100.07 रुपये दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 96 आणि डिझेलचे दर 86.97 रुपये आहेत. इतर शहरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.