पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरात विविध विकासकामे राबविण्याची खूप संधी असून या शहराच्या परंपरेला आणि व्यक्तीमत्वाला साजेशी विकासप्रणाली निर्माण करण्याचे काम मी केले. मला या शहराने प्रेम आणि सहकार्य दिले. वादसंवादातून सकारात्मकता घेवून अविस्मरणीय आठवणी माझ्या कायम सोबत असतील. या शहराचा मी सदैव ऋणी राहील, अशा शब्दात मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महापालिकेच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्रावण हर्डीकर यांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना हर्डीकर बोलत होते.
यावेळी उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, क्रीडा, कला व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे, क प्रभाग अध्यश्र राजेंद्र लांडगे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, विकास ढाकणे, नगरसचिव उल्हास जगताप, नगरसदस्य एकनाथ पवार, विलास मडिगेरी, अमित गावडे, तुषार हिंगे, अभिषेक बारणे, माऊली थोरात, नगरसदस्या वैशाली घोडेकर, सीमा सावळे, आशा शेंडगे, कमल घोलप, योगिता नागरगोजे आदी उपस्थित होते.
श्रावण हर्डीकर यांनी विविध कामांच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला. विशेषत: करोना काळात त्यांनी केलेले काम या शहराच्या कायम लक्षात राहिल असे गौरवोद्गार उपस्थित सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केले.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, श्रावण हर्डीकर यांची काम करण्याची शैली आदर्शवत आहे. त्यांनी सुरु केलेल्या कामांना पूर्णत्वास नेण्यास माझा प्राध्यान्यक्रम असेल. सर्वांना सोबत घेवून नागरिकांना विविध सोई उपलब्ध करुन देण्याकरीता मी प्रयत्न करेल.
हर्डीकर म्हणाले या शहराने मला खूप काही शिकवले. वादसंवादातून सकारात्मकता घेवून मी जात आहे. एखाद्या गोष्टीचा निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला यावर संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक आहे. मी राज्यघटनेचा पाईक म्हणून घटनेने घालून दिलेल्या नियम आणि तत्वांचे पालन केले असल्याचे सांगून त्यांनी पिंपरी चिंचवड शहर माझ्या सदैव लक्षात राहील अशी भावना व्यक्त केली. जन संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.