मुंबई : बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या मध्ये चांगलीच खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या या वादात आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एंट्री केली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. माझ्यावर टीका करा… माझ्यावर वार करा… पण माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी जाहीर व्यासपीठावरून पंकजा मुंडे यांना केली होती. यालाच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.
पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये, “तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्ट ते ईडीपर्यंत जगजाहीर आहेत. बाकी स्वपक्षातील बीड जिल्ह्याच्या विधानसभा विधानपरीषद आमदारांच्या लक्षवेधी सुचनांवर आधी जाहीर चर्चा घडवून आणा, नंतर आमचा नाद करा.”, असे म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
दोन राजकीय पक्षांमध्ये दोन विचारधारा असू शकतात. विचारधारेची लढाई विचारधारेने होऊ द्या, तुमच्या राजकीय वैऱ्याला बदनाम करायचेय तर जिल्ह्याचे नाव घेऊन बदनामी करु नका. हवे तर माझ्यावर वार करा, पण मायभूमिला बदनाम करु नका असं भावनिक आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
बीड बिहार होतोय अशी टीका पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. एवढंच नाहीतर जिल्ह्यातील ढासाळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी गृहमंत्र्यांनाही पत्र पाठवलं होतं. त्यावरच धनंजय मुंडे आणि कडाडून टीका केली आहे. पंकजा मुंडे याना आमचं चांगलं चाललेलं बघवत नसल्याने त्या जाणून-बुजून बीड जिल्ह्याला बदनाम करत आहेत. धनंजय मुंडे यांच्या या टीकेला पंकजा मुंडे यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.