भोर -संपूर्ण देश करोना विषाणूच्या विळख्यात आडकला असून, या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी सरकार कठोर उपाययोजना करीत आहेत त्यांना सहकार्य करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर केला आहे, त्यामुळे संचारबंदी असताना आपण आपल्या घरातच थांबून या विषाणूला रोखावे व आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे, असे आवाहन भोलावडे ग्रामस्थांना पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवाळे यांनी केले.
भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या माध्यमातून गणेश नगर (भोलावडे) येथील गरजू आणि मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या महिलांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्स वाटप करण्यात आले, यावेळी विठ्ठल आवाळे यांनी हे आवाहन केले.
यावेळी गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी अंत्योदय आणि भगव्या रेशनकार्ड धारकांनाही स्वस्त दराने गहू-तांदूळ दिला जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी गट विकास अधिकारी विशाल तनपुरे, सहाय्यक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, विस्ताराधिकारी रामेश्वर राठोड, रंगनाथ हुजरे, ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे, विकास सोनवणे, भोर तालुका पंचायत समितीच्या माजी सदस्या सुवर्णा मळेकर, पत्रकार भुजंगराव दाभाडे, माजी उपसरपंच मोहन आवाळे उपस्थित होते.