नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संकटातून सर्वसामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत आहेत. परंतु, काही असंतुष्ट लोकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक देण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणे, त्यांच्यावर थुंकण्यासारखे किळसवाणे प्रकार देशात घडत आहेत. इंदूरमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका वयोवृद्ध महिलेची तपासणी करायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक करुन त्यांना पळवून लावण्याची घटना घडली आहे. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
ही घटना इंदूर येथील टाटपट्टी बाखल परिसरातील आहे. तिथे आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. बुधवारी या परिसरातील एका वयोवृद्ध महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकात डॉक्टर, नर्स आणि आशा कार्यकर्त्या होत्या. या पथकाला स्थानिकांनी विरोध केला आणि लाठ्या-काठ्यांनी त्यांना मारहाण करत त्यांचा पिच्छा सुरु केला. त्यामुळे आरोग्य कर्मचारी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. यावेळी त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली.
एका वृत्तसंस्थेने याचा व्हिडिओही जारी केला आहे. यामध्ये लोक या कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना दिसतात. या कर्मचाऱ्यांना अपशब्दाचाही वापर केल्याचे व्हिडिओत ऐकू येते. हल्लेखोरांनी बॅरिकेडही तोडले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य कर्मचारी त्या महिलेची तपासणी करण्यास आले होते.