मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असतानाच विविध देशात करोनाचे डेल्टा रुग्ण वाढत असल्यामुळे शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार नफेखोरी होऊन निर्देशांकाची आगेकूच थंडावली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 300 अंकांनी कमी होऊन 55, 329 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 118 अंकानी म्हणजे 0.71 टक्क्यांनी कमी होऊन 16,450 अंकांवर बंद झाला.
टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बॅंक, स्टेट बॅंक, सन फार्मा, बजाज ऑटो या बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे मुख्य निर्देशांकांना आधार मिळाला नाही. मात्र अशा परिस्थितीतही हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, नेस्ले, बजाज फायनान्स कंपनीच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, निर्देशांक उच्च पातळीवर असले तरी अर्थव्यवस्थेला आलेली गती खरोखरच टिकून राहील का याची शंका गुंतवणूकदारांना येत आहे. त्यामुळे ग्राहक वस्तू वगळता इतर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री होताना दिसून येत आहे. त्यामध्ये धातू, रिअल्टी, सरकारी बॅंका, औषधी क्षेत्राचा समावेश होता. मिड कॅप व स्मॉल कॅपची पडझड चालूच असून आज हे निर्देशांक 2 टक्क्यापर्यंत कमी झाले. त्याचबरोबर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 595 कोटी रुपयाची गुंतवणूक काढून घेतली.
जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेला आलेली गती करणाच्या डेल्टा व्हायरसमुळे मंदावण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्याचबरोबर सध्याच्या पातळीवर निर्देशांक स्थिर राहतील का अशी शंका गुंतवणूकदारांच्या मनात येत असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत. अशीच परिस्थिती आशियाई आणि युरोपच्या शेअर बाजारात सकाळी आढळून आली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्री करणे पसंत केले.