मुंबई – व्याज दरवाढीच्या शक्यतेमुळे गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक घसरत होते. मात्र मंगळवारी बॅंका, धातू आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्यामुळे शेअर निर्देशांकात वाढ झाली.
मात्र सकाळपासून शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या जोरदार लाटा येत होत्या. त्यामुळे निर्देशांक अस्थिर होते. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 257 अंकांनी वाढून 59,031 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 86 अंकांनी म्हणजे 0.50 टक्क्यांनी वाढून 17,577 अंकावर बंद झाला.
सकाळी माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे निर्देशांक कमी झाले होते. मात्र दुपारी बॅंका, वाहन व धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांक वाढले. महिंद्रा, बजाज फिन्सर्व, टायटन, टाटा स्टील, स्टेट बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, सन फार्मा, इंडसइंड बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांक वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, विप्रो, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरण झाली.
कोटक सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असली तरी अमेरिका युरोप इत्यादी देशांमध्ये अनेक नकारात्मक घडामोडी घडत असल्यामुळे शेअर बाजारात कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे बरेच गुंतवणूकदार सध्या कुंपणावर बसून आहेत.
छोटा कंपन्याच्या शेअरच्या भावावर आधारित मिडकॅप 1.03 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.78 टक्क्यांनी वाढला. दरम्यान परदेशी संस्थापक गुंतवणूकदारांनी सोमवारी 453 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली आहे. अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह किती व्याजदर करते याकडे परदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. जर जास्त व्याजदर वाढ झाली तर हे गुंतवणूकदार परत विक्री करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.