नवी दिल्ली – गेला एक महिन्यापासून डॉलर बळकट होत असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत होती. मात्र आता डॉलर काही प्रमाणात कमकुवत झाल्यामुळे मंगळवारी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. त्या प्रमाणात भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 157 रुपयांनी वाढून 51,707 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 364 रुपयानी वाढून 55,662 रुपये प्रति किलो झाला.
आज सोने व चांदीच्या दरात झालेल्या वाढीबद्दल वाढीबद्दल बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सध्या इतर चलनाच्या तुलनेत डॉलरचा भाव सहा आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर आहे. मात्र काल आणि आज डॉलर मध्ये काही प्रमाणात घट झाली असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली.
मात्र, आगामी काळात परिस्थिती पूर्वीप्रमाणेच अनिश्चित राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक मंदीची शक्यता, व्याज दरवाढ. रशिया- युक्रेन युद्ध या कारणामुळे इतर बाजाराबरोबरच सोने आणि चांदीच्या बाजारात अस्थिरता राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.