पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी येथील नियोजित माता रमाई आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजनाच्या मूहूर्ताला अद्याप प्रतिक्षाच करावी लागत आहे. गेल्या 14 एप्रिल २०२३ रोजी भूमिपूजन करण्याची मागणी शहरातील काही संघटनांनी आयुक्तांना केली होती. सामाजिक संघटनांनी सातत्याने या साठी पाठपुरावा केला. मात्र जागा ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने भूमिपूजनाला गती मिळणार नसल्याचेच कारण सांगण्यात येत आहे. त्यामुळे आंबेडकर स्मारकासाठी आणखीन प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाची नियोजित जागा आहे. अद्याप स्मारकाच्या कामाला सुरूवात देखील झालेली नाही. या कामाला गती मिळावी म्हणून शहरातील सर्व पक्षीय, संघटनांच्या पदाधिकारी सातत्याने आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.
माता रमाई स्मारकाचे भूमिपूजन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी करण्याची इच्छा भीम अनुयायांची असते. सार्वजनिक जयंती महोत्सव करताना राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश न करता महापालिकेने नियोजन करावे, आदी मागण्या या पुर्वी मांडण्यात आल्या आहेत. मात्र जागेचा ताबा नसल्याचे कारण सांगितले जात आहे. महापालिकेच्या या संथ कारभाराविरोधात शहरातील भीम अनुयायी नाराजी व्यक्त करत आहेत.
स्मारकाबाबत प्रशासनाची उदासिनता
माता रमाई आंबेडकर स्मारकाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी शहरातील सामाजिक संघटना आंदोलने, निवेदन आदींचा मार्ग अवलंबत आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या बैठकीदरम्यान देखील याकडे लक्ष वेधले जात आहे. मात्र महापालिका प्रशासन स्मारकाबाबत उदासिन असल्याचे दिसत आहे. सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यानंतरही महापालिका प्रशासन सकारात्मक दिसत नाही.