शिक्रापूर (वार्ताहर)- सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे- नगर महामार्गावरून अंबड एसटी आगाराच्या एसटीचा अपघात झाल्यानंतर रस्त्याकडेला लावलेल्या गाडीतून रात्री चोरट्यांनी डिझेलची चोरी केली. चोरट्यांनी १४० लिटर डिझेलवर हात साफ केले.
सणसवाडी येथे अंबड एसटी आगाराच्या एसटीमधून चालक व वाहक प्रवाशी घेऊन पुणे बाजूने नगर दिशेने जात होते. एसटीचा सणसवाडीमध्ये अपघात झाल्याने चालक व वाहकांनी एसटीमधील प्रवाशी दुसऱ्या एसटीमध्ये पाठवून देत आगारप्रमुखांना माहिती दिली.
रात्री रस्त्याचे कडेला एसटी लावून चालक व वाहक झोपले होते. सकाळी चालकांना एसटीच्या डिझेल टाकीचे झाकण उघडे दिसल्याने त्यांनी डिझेल टाकीची तपासणी केली.
एकशे चाळीस लिटर डिझेल चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत एसटी चालक राजेंद्र प्रभाकर तिडके (रा. अंबडरोड, जि. जालना) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करीत आहेत.