खासगी हॉस्पिटलमधील करोना बाधितांना घरी सोडण्याचा पालिकेचा निर्णय
पुणे – करोनाची सौम्य तसेच अतिसौम्य लक्षणे असलेल्यांना घरीच उपचारासह, विलगीकरण करण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबाजावणी केवळ सधन बाधितांसाठीच केली जाणार आहे. त्यामुळे केवळ 10 टक्केच रुग्णांनाच या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर महापालिका तसेच कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वसमान्य बाधितांची संख्या लक्षणीय असली, तरी त्यांच्याकडे विलगीकणासाठी पुरेसी जागा नाही. त्यामुळे त्यांना पालिकेच्या रुग्णालयातच उपचार घ्यावे लागणार आहेत.
शहरात करोनाच्या दैनंदिन नवीन बाधितांचा आकडा सरासरी 400 वर गेला आहे. त्यामुळे सक्रीय बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तर गंभीर बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जुलैमध्ये हा आकडा आणखी वाढण्याची भीती असून शहरातील करोना बाधितांचा एकूण आकडा जुलैअखेर सक्रीय बाधितांची संख्या 9 हजार आणि गंभीर बाधितांचा आकडा हजारावर जाण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिकेने आता त्याकडे केंद्रीत केले आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांसह, ज्यांच्यावर प्रत्यक्ष रुग्णालयात उपचाराची गरज भासेल, अशांसाठी शहरातील खासगी हॉस्पिटलमधील करोनाबाधित घरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खासगी हॉस्पिटलमधील रुग्णच का?
करोना संसर्ग झाल्यानंतर सधन कुटुंबातील रुग्ण खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचारांसाठी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे शहरातील अनेक हॉस्पिटल्समध्ये अशा लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असलेल्यांची गर्दी आहे. त्यामुळे करोनाच्या गंभीर तसेच अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे ज्या सधन व्यक्तींकडे विलगीकरणासाठी पुरेशी जागा, ज्यांच्याकडे स्वतंत्र, स्वच्छतागृहे तसेच घरे आहेत. त्यांना घरी सोडल्यास या खाटा रिकाम्या होणार आहे. अशा खाटांची संख्या 10 टक्के असली, तरी त्यामुळे गंभीर रुग्णांवर उपचार शक्य होणार आहे. त्यामुळे हमीपत्र तसेच काही अटींवर घरी सोडले जाणार आहे. तर पालिकेची रुग्णालये तसेच कोविड-19 रुग्णालयांत झोपडपट्टीमधीलच सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यांच्याकडे विलगीकरणासाठी पुरेशी जागाही नाही. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार केले जाणार आहेत.