चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने तैनात केली स्पेशल ‘माऊंटन फोर्स’

नवी दिल्ली : मागील आठवड्यात चीनकडून झालेल्या हल्ल्यानंतर आता भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज झाले असल्याचे सांगण्यात येत आहे कारण आता चीनकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यास परतून लावण्यासाठी लष्कराने आपली रणनीती ठरवली आहे. यासाठी कुठलाही हल्ला परतवून लावण्यासाठी भारताने डोंगराळ भागातील युद्ध लढण्यात निपुण असलेली विशेष फोर्स तैनात केली आहे. चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या पश्चिम, मध्य आणि पूर्व सेक्टरच्या सीमारेषेवर ही विशेष माऊंटन फोर्स तैनात झाली आहे.

कुठल्याही परिस्थितीत नियंत्रण रेषा सुरक्षित ठेवण्याचे भारतीय लष्कराला निर्देश देण्यात आले आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने गलवान खोऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करुन ठेवली आहे. चीनची युद्धवाहने देखील इथे मोठया प्रमाणामध्ये आहेत. मागच्या अनेक वर्षात भारताने डोंगराळ भागातील युद्ध लढण्यासाठी विशेष तुकडयांना प्रशिक्षित केले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.

छापेमारी युद्ध कलेत हे सैनिक पारंगत आहेत. कारगिल युद्धाच्यावेळी या सैन्य तुकड्यानी आपली क्षमता दाखवून दिली होती. डोंगराळ भागात युद्ध लढणे सोपे नाही. हे खडतर आव्हान असते. मानवहानी देखील मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. उत्तराखंड, लडाख, गोरखा, अरुणाचल आणि सिक्कीममधून येणारे जवान या युद्धकलेत पारंगत आहेत. त्याला कुठलीही तोड नाही. तोफखान किंवा मिसाइल जरी असले तरी, डोंगराळ भागातील युद्धामध्ये निशाणा अत्यंत अचूक असावा लागतो. अन्यथा तुम्ही केलेला वार वाया जाऊ शकतो. या सर्व कलागुणांत संपन्न असणाऱ्या जवानांचा या स्पेशल टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.