रिकव्हरी रेट 65.22%
सक्रिय बाधित 30.92
मृत्यूदर 4.67
पुणे – लॉकडाऊननंतर शहर पूर्वपदावर येत असताना, गेल्या दहा दिवसांत सुमारे 2 हजार करोनाबाधित वाढले आहेत. पण, दुसऱ्या बाजूला आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोनावर मात करून घरी जाणाऱ्यांची संख्या तब्बल 65.22 टक्के आहे. तर उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 30.92 टक्के असून 5 टक्क्यांवर असलेला मृत्यूदरही 4.67 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
9 मार्च रोजी शहरात पहिला करोनाबाधित आढळला होता. त्यानंतर शहरातील एकूण बाधित 9 हजार 82 वर पोहचले असले, तरी त्यातील सुमारे 5, 924 जण (सुमारे 65.22 टक्के) बरे होऊन घरी गेले आहेत. तर प्रत्यक्ष 2,733 ( 30.92 टक्के) बाधित उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत सुमारे 425 (4.67 टक्के ) जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे वेळीच झालेले निदान आणि लक्षणे दिसताच तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधल्यास करोनापासून ठणठणीत बरे होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 26 मे रोजी शहरातील सक्रिय बाधितांची टक्केवारी सुमारे 46, मृत्यूदर 5 आणि बरे होणाऱ्याचे प्रमाण 59 टक्के होते. मात्र, मागील दोन आठवड्यांत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.
दरम्यान, ही आकडेवारी पुणेकरांना दिलासादायक वाटत असली, तरी या काळात वैयक्तिक तसेच कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. सोबतच अत्यावश्यक कामानिमित्त घराबाहेर पडल्यास मास्क, सॅनिटायझरचा वापर करणेदेखील आवश्यक आहे.
बाधित दुप्पट होण्याचा कालावधी 19 दिवसांवर
शहरात करोनाबाधित दुप्पट होण्याचा कालावधीही आता 19 दिवसांवर गेला आहे. यापूर्वी तो 14 दिवसांचा होता. दि.7 मे रोजी शहरातील करोना बाधित 2,146 होती ती 21 मे रोजी दुप्पट होऊन 4,107 झाली, तर त्यानंतर ही संख्या 9 जून रोजी दुप्पट होऊन 8,205 झाली आहे. तर दुप्पट होण्याचा कालावधी 19 दिवसांवर गेला आहे.