पुणे -छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरून आता पुण्यात स्टिकर वॉर’ सुरू झाले आहे. हा वाद निर्माण होण्यामागे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांच्या समर्थनार्थ शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने छपत्रती संभाजी महाराजांचे स्वराज्यरक्षक असे नमूद केलेले स्टिकर प्रकाशित केले असून, हे स्टिकर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपल्या वाहनांना लावणार आहेत. तर, राष्ट्रवादीच्या या कृतीला विरोध म्हणून शहर भाजपकडून धर्मवीर संभाजी महाराज की जय’ असे स्टिकर प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यात छपत्रती संभाजी महाराजांवरून स्टिकर वॉर’ सुरू झाले आहे. भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे स्टिकर स्वत:च्या वाहनांना लावणार आहेत.
राज्याच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्यरक्षक होते, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यांवरून राज्यात मोठा राजकीय वाद सुरू असून, महाविकास आघाडीकडून पवारांचे समर्थन केले जात आहे, तर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेकडून पवार यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने केली जात आहे. त्यातच आता पुण्यात या वादाचा नवा अंक सुरू आहे. शहर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या वक्तव्यांचे समर्थन करत छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक असा उल्लेख असलेली स्टिकर प्रकाशित करण्यात आली असून, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते स्टिकर जागोजागी लावत आहेत. तर शहर भाजपकडून त्याला प्रत्युत्तर म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची धर्मवीर असा उल्लेख असलेली स्टिकर शुक्रवारी प्रकाशित करण्यात आली आहेत.