हडपसर – पत्रकार एक महत्त्वाचा घटक म्हणून समाजामध्ये काम करत असतो. चौथा स्तंभ म्हणून आपण सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतो ,आणि राजकीय जीवनामध्ये आम्ही सगळेजण समाजकारणात -राजकारणात काम करणारी माणसं, परंतु शेवटी माणूस कुठेतरी चुकतो .कुठेतरी कमी पडतो. त्यावेळेस त्याला त्याची चूक लक्षात आणून देण्याचं काम त्या संदर्भामध्ये योग्य तो सल्ला देण्याचे काम किंवा खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती समाजाच्या समोर मांडण्याचं काम हे पत्रकार मित्रांना करावे लागते. असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कै. बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिनानिमित्ताने हडपसर परिसरातील पत्रकारांचा सन्मान अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.आमदार चेतन तुपे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले , पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर ,माजी नगरसेवक शिवाजीराव पवार, योगेश ससाणे, साधना बँकेचे संचालक प्रवीण तुपे, अमर सृष्टी सोसायटीचे चेअरमन स्वप्निल धर्मे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार विवेकानंद काटमोरे, कृष्णकांत कोबल, सुधीर मेथेकर, अशोक बालगुडे, प्रमोद गिरी, तुषार पायगुडे, जयवंत गंधाले,अनिल मोरे, दीपक वाघमारे, दिगंबर माने, अमित मेहंदळे, वसंत वाघमारे, रागिनी सोनवणे यांचा पुस्तक, शाल व श्रीफळ देऊन अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, संदीप बधे, यांनी केले होते.