ढाका – शुक्रवारी रात्री बांगलादेशातील कुश्टिया शहरात उभारण्यात येत असलेल्या बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या तोडफोडीचे कारस्थान रचल्याप्रकरणी दोन स्थानिक मदरशा विद्यार्थ्यांसह दोघांना अटक केली.
हे कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री आणि सत्ताधारी अवामी लीगचे सरचिटणीस ओबायदुल कदेर यांनी म्हटले आहे. देशाचे संविधान आणि कायद्यांविरूद्ध अवमानकारक टीका, टिप्पण्या किंवा वागणूक देणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असे अवामी लीगच्या सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना ओबायदुल म्हणाले.
बंगबंधूंच्या पोर्ट्रेटचे प्रदर्शन व जतन करणे ही घटनेनुसार वैधानिक बाब आहे. बंगबंधूंच्या शिल्पाची विटंबना करणे ही देशाच्या घटनेची बदनामी करण्यासारखे आहे. असे ते म्हणाले.
शुक्रवारी ढाका येथील बैतुल मुकरम मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शकांचा पोलिसांशी संघर्ष झाला होता. देशातील सर्व शिल्पे पाडण्याच्या मागणीसाठी त्यांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी झालेल्या दुसऱ्या घटनेत ढाका विद्यापीठ परिसरातील “मधु दा’ पुतळ्याचे अर्धवट नुकसान करण्यात आले होते.