जेजुरी -महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडकोट पायरीमार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा सुमारे 12 फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण होत आहे. राज्यातील स्थिती पूर्वपदावर येताच आणि भाविकांसाठी मंदिरे खुली होताच मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.
या कामासाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च होणार आहे. पायरीमार्गावर दगडी चौथरा व त्यावर 12 फूट उंचीचा ब्रॉंझचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मूळचे जेजुरीवासीय शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्या कलासंस्कार आर्ट संस्थेकडून हे काम पूर्ण करण्यात येत आहे. जेजुरीच्या खंडेरायाचे निस्सीम भक्त म्हणून होळकर घराण्याचा मोलाचा वाटा आहे.
जेजुरी नगरीच्या विकासाच्या खऱ्या शिल्पकार साध्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक अथवा पुतळा शहरात व्हावा, अशी मागणी समाजबांधव व विविध संघटनांनी केली होती. या मागणीचा विचार करून श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पुतळ्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे.