भाडे आकारणीवर नियंत्रण : वाहने ताब्यात घेण्याचा प्रशासनाचा निर्णय
पुणे – करोना बाधिताला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असते. परंतू, काही घटनांमध्ये खासगी रुग्णवाहिका जादा दर आकारत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे. त्याची गंभीर दखल घेत आता भरमसाठ शुल्क देण्यातून रुग्णाची सुटका होणार आहे. खासगी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत आरोग्य विभागाने निर्णय जाहीर केला आहे. गंभीर रुग्णांसाठी या रुग्णवाहिका वापरल्या जाणार आहेत.
करोना परिस्थितीत रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यासाठी रुग्णालये, स्वयंसेवी संस्थांकडील रुग्णवाहिका उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. तसेच गरजेनुसार खासगी वाहन पुरवठादारांची वाहने देखील रुग्णवाहक म्हणून वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णवाहिकांबद्दल प्रशासनाचे नियम
* प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवलेल्या दरानुसार भाडे तत्वावरील वाहनांचे दर निश्चित करावे.
* रुग्णवाहिका वाहन चालकासह, इंधनाच्या खर्चासह भाडे तत्वावर घेता येतील
* वाहन चालक उपलब्ध नसेल, तेथे रुग्णवाहिका मासिक भाडेतत्वावर ताब्यात घेण्यात येतील.
* रुग्णवाहिकेत स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधा असेल.
* रुग्णवाहिकेला संपर्कासाठी रुग्णांना 108 क्रमांक किंवा स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल