सांगवी – पिंपरी-चिंचवड खासगी कोचिंग क्लासचालक, शिक्षक यांच्याकडून क्लासेस सुरू करण्यासाठी व त्याबाबत शासनाला पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी खासगी शिकवणी व कोचिंग क्लासचालक मोठ्या अडचणीत सापडले असल्याचे या वेळी ठाकरे यांना सांगण्यात आले. त्यामुळे लवकरात लवकर क्लास सुरू करण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाचे करोनासंबंधी असलेल्या सर्व नियमांचे पालन करून क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, याबाबत चर्चा केली. करोना संसर्गामुळे शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणी घेणाऱ्या असंख्य कॉन्ट्रॅक्ट व खासगी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. करोनामुळे गेले सहा महिने झाले गाळे व इतर जागांचे भाडे क्लासचालकांना खिशातून भरावे लागत आहे. हा खर्च महिन्याला पंधरा हजार ते पन्नास हजार रुपये व त्याहूनही जास्त असून गेले सहा महिने झाले हा खर्च अनेक लाख रुपयेमध्ये जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे खासगी शिकवणी चालक मोठ्या आर्थिक अडचणीत आले असून शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत अथवा क्लास चालू करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
या वेळी कोचिंग क्लास असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर, राज्य उपाध्यक्ष प्रा. पी. एम. वाघ, प्रा. अरुण पठाडे, पिंपरी-चिंचवड महानगराध्यक्ष प्रा. उमेश बोरसे, प्रा. अजब मनवर, सुनील सलोखे, शंकर उरचन, दिनेश पळासे, रामेश्वर जंगले, अशोक पाटील, चिटणीस प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे, राज्य कोषाध्यक्ष प्रा. अप्पासाहेब म्हस्के पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा. गणेश ढाकणे, पुणे महानगर अध्यक्ष प्रा. यशराज चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.