शिक्रापूर – शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा माहोल चांगलाच तापला आहे. कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनकडून नोटीसा दिल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत प्रचाराची दिशा बिघडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच गावात नोटीस देऊन परावृत्त करण्यात आल्याने डॉ. अमोल कोल्हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
यावर बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, मी देखील करंदी गावात प्रचारदरम्यान गेलो होतो. गावातील एका कार्यकर्त्याने मला प्रश्न विचारला होता. त्याच्या प्रश्नाचे उत्तर आणि त्याच्या शंकांचे निरसन होईल, अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने मी त्याचे समाधान केले होते; परंतु विरोधी उमेदवाराला कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली. जे करंदी गाव आपण दत्तक घेतले त्याच दत्तक गावातील लोकांना अशा प्रकारे दडपशाही करून नोटिसा पाठवण्याची वेळ येत असेल तर त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. हे स्पष्ट दिसून येत आहे.
दरम्यान करंदी (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच बबन उर्फ बबलू ढोकले, जावेद इनामदार, योगेश ढोकले, सागर झेंडे यांना पोलिसांनी नोटीस बजावली. वरील नोटीस मिळालेल्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही कोणतेही सभेत अथवा प्रचार दौर्यात कोणालाही कोणतेही प्रश्न विचारणार नव्हतो. कोणी आमच्या गावात प्रचाराला येणार आहेत याची कोणतीही कल्पना नव्हती.