जुन्नर, (वार्ताहर) – छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, बुचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू. तसेच गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर आयोजीत अभिवादन सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले.
प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते. शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत. जाणता राजाचे महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हिरडा नुकसानभरपाईसाठी 15 कोटी
निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे 15 कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.
साबळे,भुजबळ व काकडे यांना पुरस्कार
किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणार्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त ब्रिगेडियर अनिल काकडे आणि अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ. अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला.
शिवाई देवराई आणि वन उद्यानाचे लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे मशिवाई देवराईफ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र मशिवाई देवराईफ विकसित करण्यात आली आहे.
देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.