नारायणगाव, (वार्ताहर) – शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय विश्रामगृहांकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. दरवर्षी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहांसाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध होत असतो; परंतु आजही शिवजन्मभूमीतील जुन्नर व नारायणगाव विश्रामगृहांची दुरवस्था झालेली दिसून येत आहे.
दरवर्षी शासनाकडून जुन्नर परिसरातील शासकीय विश्रामगृहांच्या दुरुस्तीसाठी भरघोस निधीसाठी अधीक्षक अभियंता मान्यता देत असतात. चालू वर्षी अधीक्षक अभियंता यांनी 51 लाखांच्या निधीस मंजुरी दिली आहे. परंतु तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रियेची पूर्तता न झाल्यामुळे नारायणगाव शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नाही. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो.
शिवजयंतीच्या निमित्ताने दूरवरून मुक्कामी येणारे पर्यटक राहण्यासाठी शासकीय विश्रामगृहांना पसंती देत असतात; परंतु जुन्नर तालुक्यातील शासकीय विश्रामगृहांची झालेली दुरवस्था बघता शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवजन्मभूमी असलेल्या तालुक्यातील मध्यवर्ती असलेल्या नारायणगाव व जुन्नर येथील शासकीय विश्रामगृहाच्या दुरावस्थेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा असंवेदनशीलपणा, निष्क्रियता कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
या आहेत समस्या
नारायणगाव शासकीय विश्रामगृहातील स्वच्छतागृह निकामी झाले असून खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत. पाणीपुरवठा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. गरम पाण्याचे हिटर बंद अवस्थेत आहे. बसण्यासाठीचा सोफा, बेड, फरशी, फर्निचर, फॅन या वस्तूंची दुरवस्था झाली आहे.
निधी जातो कुठे..
शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील विश्रामगृहांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी शासनाकडून निधी मंजूर होत असेल तर तो निधी जातो कुठे असा प्रश्न निर्माण होतो. अनेक वर्षांपासून विश्रामगृहातील फाटलेले सोफे, खराब झालेल्या गाद्या, बिघडलेले फॅन, पाणी तुंबलेले बाथरूम, अस्वच्छ टॉयलेट, फुटलेल्या खिडक्यांच्या काचा, फुटलेला फरशा अशी दुरावस्था दिसून येत आहे. मग विश्रामगृहांच्या दुरुस्तीसाठी मंजूर केलेला निधी कोणाच्या खिशात जातो याचा शोध घेणे गरजेचे आहे.
विश्रामगृहाचा बंदचा बोर्ड मात्र…
नारायणगाव विश्रामगृहाबाहेर विश्रामगृहाचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने विश्रामगृह बंद आहे, असा कार्यकारी अभियंता यांच्या नावे सूचनाफलक लावण्यात आलेला आहे; परंतु विश्रामगृहाच्या आतमध्ये प्रत्यक्षात कुठलेही काम सुरू नसल्याचे दिसून येत आहे.