पुणे विद्यापीठाच्या निर्णयावर उच्च शिक्षण विभागाने मागवला खुलासा
आपलाच निर्णय फिरवण्याची विद्यापीठावर नामुष्की
पुणे – राज्यात जानेवारी अखेरपर्यंत लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाची परवानगी न घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या 11 जानेवारी रोजी संलग्नित महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे दोन परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात संभ्रम वाढला आहे. राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून परवानगी न घेता पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याने, त्यांचाच निर्णय आता अंगलट आला आहे. याप्रकरणी उच्च शिक्षण विभागाने पुणे विद्यापीठाला खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
पुणे विद्यापीठाने घाईत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. याउलट विद्यापीठ अनुदान आयोगाने स्थानिक परिस्थिती आणि राज्य शासन नियमाच्या अधिन राहून महाविद्यालय सुरू करण्यास मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. परंतु, राज्य शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत पुणे विद्यापीठाने थाटात महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहे. त्यातच आता ब्रिटन स्ट्रेनचे रुग्ण आढळल्याने राज्य शासनाची चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन आहे. ही परिस्थिती असताना विद्यापीठाने कोणत्या आधारावर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न निर्माण होत आहे. समितीने निर्णय घेतला असला तरी कुलगुरू आणि प्र-कुलगुरुंनी यांनी राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दोन परिपत्रकावरून संभ्रम
पुणे विद्यापीठाने दि. 4 जानेवारी रोजी परिपत्रक प्रसिद्ध करून 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. राज्य शासनाने परवानगीच दिली नसताना हा निर्णय घेतलाचा कसा? असा प्रश्न आहे. या परिपत्रकावरून चूक लक्षात येताच पुन्हा दि. 7 जानेवारी रोजी नव्याने परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यात महाविद्यालये राज्य शासनाच्या नियमाला अनुसरून सुरू होतील, असे नमूद केले. म्हणजेच दि. 4 जानेवारीचे परिपत्रकच रद्द झाल्यासारखे आहे. महाविद्यालये कधी सुरू होणार आहेत, याचा कोणताच उल्लेख परिपत्रकात नाही. त्यामुळे गोंधळात भर पडली आहे.
पुणे विद्यापीठाला खुलासा सादर करण्याचे निर्देश
विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार शासनाने कोणतेही आदेश निर्गमित केलेले नसतानासुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 11 जानेवारीपासून वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या नियमाच्या आधारे हा निर्णय घेतला, त्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश उच्च शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुयश दुसारे यांनी दिले.
तूर्तास महाविद्यालये सुरू होणे अशक्य
विद्यापीठाने नव्याने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावरून महाविद्यालये दि. 11 जानेवारीपासून सुरू होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्णयानंतर महाविद्यालये सुरू होतील. त्यामुळे महाविद्यालये इतक्यात सुरू होतील, याची शक्यता कमी आहे. एकूणच विद्यापीठाने अतिघाई करीत विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ वाढविला आहे.
पुणे विद्यापीठाने महाविद्यालय सुरू करण्याचे परिपत्रक काढले. तेच रद्द करीत सुधारित परिपत्रक काढले जाते. त्यावरून संभ्रम वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमांच्या अधिन राहून अभ्यासपूर्ण परिपत्रक काढणे अपेक्षित आहे.
– प्राचार्य नंदकुमार निकम, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ