सातारा (प्रतिनिधी) : चोवीस तासापूर्वी उद्घाटन झालेल्या ग्रेड सेपरेटरच्या एका मार्गीकेचा नामकरण झालेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक अज्ञाताने फाडल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी निषेध करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या राजे समर्थकांनी ग्रेड सेपरेटरच्या पुलावरच निषेध सभा घेतली. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे अॅड दत्ता बनकर, नगरसेवक किशोर शिंदे, संग्राम बर्गे, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यावेळी उपस्थित होते .
अॅड़ दत्ता बनकर हे सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी ग्रेड सेपरेटर जवळ आले असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा राज्यभर गाजत असताना राजधानी साताऱ्यात संभाजी महाराजांचा फलक फाडला जावा या विषयी संताप व्यक्त होत आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन फलक ताब्यात घेतला. व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.