भंडारा अग्नितांडव! मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश;मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

मुंबई : आज पहाटे भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात १० नवजात शिशूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, या हृदयद्रावक घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी माहिती घेण्याबरोबरच घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा केली असून, त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

याचबरोबर, या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर सात बालकांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेत आरोग्य राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.