इंदापूर प्रतिनिधी
नीलकंठ मोहिते
इंदापूर तालुक्यातील गावागावात नव्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, तर काही झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील दळणवळण सुस्थितीत झाले असून, खऱ्या अर्थाने नवीन रस्त्याच्या माध्यमातून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलत आहे. राज्य सरकार इंदापूर तालुक्यात निधी देण्यासाठी कोठेही कमी पडत नाहीत. त्यामुळे विकास कामे पूर्ण होत आहेत, अशी माहिती राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी शिरसोडी गावकऱ्यांच्या वतीने आमदार भरणे यांचा नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी नागरिकांशी भरणे यांनी संवाद साधला. याशिवाय आमदार भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन शिरसोडी – खामगळ वस्ती रस्त्यासाठी २ कोटी ६७ लाख मंजूर करण्यात आले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे यांचे लक्ष इंदापूर तालुक्यावर विकास करण्यासाठी कायमचे आहे. प्रत्येक गावातील रस्ता परिपक्व व्हावा ही त्या-त्या भागातील नागरिकांची मागणी असते. लोकांच्या समस्या, अडचणी, गरजा ज्या लोकप्रतिनिधीला जाणून घेता येतात. तोच लोकप्रतिनिधी कामे मार्गी लावू शकतो. नागरिकांना जनतेला सुख सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. यावेळी शिरसोडी भागातील गावकरी, ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.