मुंबई – बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. नवनवीन चित्रपट नेहमीच तो प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असतो. आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (Gandhi Jayanti 2023) अक्षयने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अक्षयने त्याच्या ‘स्काय फोर्स’ (Sky Force) सिनेमाची घोषणा केली आहे. याशिवाय या सिनेमाचा टीझर देखील त्याने शेअर केला आहे. ‘आज गांधी आणि शास्त्री जयंतीनिमित्त संपूर्ण देश जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानच्या घोषणा देत आहे. ‘स्काय फोर्स’ या सिनेमाची घोषणा करण्यासाठी आजच्यासारखा दिवस असूच शकत नाही. हवाई युद्धाची गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमावर प्रेम करा. जय हिंद..जय भारत…’स्काय फोर्स’ हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे,’ असे टीझर शेअर करत अक्षयने लिहिले आहे.
View this post on Instagram
‘स्काय फोर्स’ हा सिनेमा भारताच्या पहिल्या हवाई युद्धावर आधारित आहे. या सिनेमात खिलाडी कुमार हवाई दलातील अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘स्काय फोर्स’ या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर आणि संदीप केवलानी यांनी केलं आहे. या चित्रपटाचे टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे देखील म्हंटले आहे.
दरम्यान, अक्षय ‘स्काय फोर्स’सह ‘वेलकम 3′,’हेरा फेरी 3’, ‘हाऊसफुल 5’ ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. नुकताच त्याचा OMG 2 हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नाही.