नाशिक : लाँकडाऊन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान धाडी टाकत तब्बल २१ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. तर २१५ हून अधिक गुन्हे दाखल करुन ८ जणांना अटक केले आहे.राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे अवैध धंद्याच्या सुळसुळाट झाला आहे. तर काही ठिकाणी दुकानदार अधिक चढ्या भावाने मालाची विक्री करताना दिसत आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत गर्दी टाळण्यासाठी मद्याची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे तळीरामांचे हाल हाेत असल्याने अनेकांनी विविध मार्ग शोधले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या काळात मद्यवाहतूकीबरोबरच मद्यनिर्मीती आणि अवैध विक्री रोखण्यासाठी जिल्हाभरात अभियान राबवले आहेत.
लॉकडाऊन काळात बेकायदा मद्यविक्री करतांना आढळून आल्यास थेट परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी जारी केले आहे. ग्रामिण भागातील गावठी मद्याने शहरात शिरकाव केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. या विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान कारवाई करीत २१५ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत भरारी पथकांनी आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत तर २०० हून अधिक संशयीत पसार झाले आहेत.