शिरूर -करोना व्हायरस आजार संदर्भात सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे या करिता शिरूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना उपचारासाठी कम्युनिटी हेल्थ क्लिनिक (जनता रूग्णालय) सोमवार (दि. 13) पासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
शिरूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मुंबई बाजार अंगणवाडी, नगरपालिका शाळा क्रमांक पाच, नगरपालिका शाळा क्रमांक एक, या चार ठिकाणी जनता रूग्णालय सुरु करण्यात आले असून या दवाखान्याची वेळ वेळ सकाळी 9 ते 11 व दुपारी 4 ते 6 अशी राहणार आहे. शिरूर शहरातील वरील चार ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या जनता रूग्णालयामध्ये सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे यावर उपचार होणार आहेत.
तरी शिरूर शहरातील सर्व नागरिकांनी वरील लक्षणे आढळल्यास जनता रूग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे. शिरूर शहरातील विविध भागात प्रभागनिहाय सोडियम हायपोक्लोराईड जंतू नाशकाची फवारणी करण्यात आली. शिरूर शहरात सुरू असलेला भाजीपाला, किराणा दुकान, औषधालय, पेट्रोल, डिझेल, दूध डेअरी अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे रोकडे यांनी सांगितले.