जुन्नर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू विक्री सुरू असल्याचे पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यांवरून स्पष्ट होत आहे. अनेकदा छापा टाकल्यावर थोडासा मुद्देमाल जप्त होतो आणि आरोपीला हाक मारल्यावर तो पळून गेला, हे वाक्य जवळपास अनेक एफआयआरमध्ये असल्याचे दिसून येत असते. त्यामुळे थांब, थांब ! पळून जाऊ नकोस…हे वाक्य दारू छाप्यातील तक्रारीमध्ये हमखास आढळत आहे.
त्यामुळे अट्टल गुन्हेगारांना किंवा हत्यारबंद चोरट्यांना शिताफीने पकडणाऱ्या पोलीस यंत्रणेला ग्रामीण भागातील दारू विक्रेते हातावर तुरी देऊन कसे पळून जातात, हा प्रश्न निर्माण होत आहे. यामागे काय गुपित असावे, या विक्रेत्यांना कुणाचा आशीर्वाद आहे, विविध बिअरबार मधून विक्री कशी होते आदी विषयांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
सध्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे दारूविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लपून छपून विकल्या जाणाऱ्या हातभट्टीची दारू, मोहाची दारू तसेच ताडीची चलती असल्याचे चित्र आहे. तर बारवर बंदी असली तरी हस्तकांमार्फत मद्य विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, तळीरामांना त्यासाठी डबल किंवा जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
जुन्नर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप उत्तर्डे यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार नोंदवून बिअरबारमधील या छुप्या विक्रीकडे लक्ष वेधले होते. या नंतर या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील आणे येथील एका हॉटेल वर छापा टाकून लाखोंचे मद्य जप्त केले आहे. तसेच खुबी, नाणेघाट, जुन्नर आदी ठिकाणी अवैधरित्या दारू, ताडी विकणारे पोलिसांच्या निदर्शनास आले आहेत.