नवी दिल्ली : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सीआरपीएफ जवानाने आपल्याच साथीदारांवर अचानक गोळीबार केला. या घटनेमध्ये चार जवानांचा मृत्यू झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत. सर्व जवान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आहेत. गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव रितेश रंजन आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे .
Chhattisgarh: Four jawans of CRPF 50 Bn killed and 3 injured in a case of fratricide in a CRPF camp in Maraiguda Police station limits of Sukma. A jawan had opened fire at the camp. pic.twitter.com/4ZF64RCNKM
— ANI (@ANI) November 8, 2021
रितेश रंजन नावाच्या जवानाने पहाटे पावणेचार वाजताच्या सुकमा येथील मराईहगुडा स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लिंगमपल्ली सीआरपीएफ कँपमध्ये गोळीबार केला. यावेळी त्याने ७ जवानांवर गोळ्या झाडल्या. सीआरपीएपच्या 50 बटालीयनच्या चार जवानांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जवान जखमी आहेत. त्यांना तातडीने भद्राचलम परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यातील चौघांचा मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जवानाने आपल्याच कॅम्पवर गोळीबार का केला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सीआरपीएफकडून या घटनेचा तपास केला जात आहे.
बस्तरचे आयजीपी सुंदरराज यांनी सांगितले की, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाद झाल्यानंतर सीआरपीएफच्या जवानाने आपल्या एके-47 रायफलने अन्य साथीदारावर गोळीबार केला. यामध्ये चार जवानांचा जागीच मृत्यू झालाय. तीन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच, अन्य जवान आणि अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. आरोपी जवानाला पकडण्यात आले आहे. पोलिस आणि सीआरपीएप आरोपी जवानाची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर सीआरपीएफने या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.