पुण्यातून 3280 प्रवाशांनी केला प्रवास
पुणे – एसटी बससेवा आजपासून सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी पुण्यातील प्रवाशांनी या सेवेला चांगला प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी पुण्यातून तब्बल 3280 प्रवाशांनी एसटीने प्रवास केल्याची माहिती एसटीच्या पुणे विभागीय कार्यालयाने दिली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेली साडेचार महिने बंद असलेली एसटी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. पुण्यातूनही राज्यभरात बसेस धावणार आहेत.
पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या 35 मार्गावर एकूण 164 फेऱ्या मार्फत वाहतूक करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, दादर, ठाणे, बोरवली, पंढरपूर, नाशिक, औरंगाबाद तसेच कोकण व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वाहतूक करण्यात आली.
प्रत्येक बसमध्ये 20 ते 22 प्रवाशांचा समावेश होता. यापैकी दादर, ठाणे, बोरीवली या मार्गावर शिवनेरी बसेस तर सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक मार्गावर शिवशाही बसेस चालवण्यात आल्या. तर इतर मार्गांवर साध्या बस धावल्या असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.