महाबळेश्वर (प्रतिनिधी) – पोलादपूर-महाबळेश्वर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. अक्कलकोट-महाड एसटी बस १५-२० फूट दरीत कोसळली. सुदैवाने बस आंब्याच्या झाडात अडकल्याने मोठा अपघात टळला. यामध्ये प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अक्कलकोट-महाड एसटी बस बुधवारी सायंकाळी ७ वाजता महाडच्या दिशेने निघाली होती. या बसमध्ये ५०हुन अधिक प्रवासी प्रवास करत होते. पायटा गावाच्या हद्दीत समोरून गाडी आल्याने बसचालकाने ब्रेक दाबल्याने बस साइट पट्टीवर घसरली आणि संरक्षक कठड्याला तोडून सुमारे 15 ते 20 फूट दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने गाडी आंब्याच्या झाडाला अडकल्याने सर्वांचे प्राण वाचले. काळ आला पण वेळ आली नव्हती याचीच प्रचिती या अपघातावेळी आली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
पायटा ग्रामस्थांनी सर्व जखमींना बसमधून बाहेर काढून खाजगी वाहनातून ताबडतोब रुग्णालयात पाठवले. घटनास्थळी जिल्हापरिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, शहरप्रमुख सुरेश पवार, प्रतापगड येथील मृणाल उतेकर पोहचले आहेत.
दरम्यान, गतवर्षी याच मार्गावर दाभिल टोक लागत बसला झालेल्या अपघातात ३० जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.