पुणे – यंदाही पुणेकरांनी दिवाळीचा मुहूर्त साधत वाहन खरेदीला पसंती दर्शवली आहे. यात तब्बल 7 हजार 860 वाहनांची खरेदी झाली आहे. या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करण्यात आली असून करापोटी आरटीओला तब्बल 25 कोटी 36 लाख 55 हजार 943 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
गेल्या वर्षी दिवाळीमध्ये 14 हजार 185 वाहनांची नोंदणी झाली होती. याद्वारे 25 कोटी 20 लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहनांच्या खरेदीमध्ये निम्म्याने घट झाली आहे. मात्र, महसुलामध्ये काही अंशी वाढ झाल्याचे चित्र आहे.
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला नवीन वस्तूंची खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. यंदाही पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली आहे. दिवाळीत नवीन वाहन घरी आणण्यासाठी नागरिक आधीच वाहनांची खरेदी करतात. त्यानंतर आरटीओमध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वाहनांची नोंदणी केली जाते. यंदा रविवारी कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. दरम्यान, यंदा वर्षभरात जवळपास 24 हजारांहून नवीन वाहने रस्त्यावर उतरली आहेत.
कोंडी वाढणार
सार्वजनिक प्रवासी वाहतूक कोलमडली असल्याने वैयक्तिक वाहनांच्या खरेदीची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे. मागील काही वर्षांपासून नव्या दुचाकी वाहनांच्या खरेदीचा वेग प्रचंड वाढला आहे. सद्यःस्थितीत शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनसंख्या वाढत आहे. पर्यायाने वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर येत असल्याने प्रदूषणाचा प्रश्नदेखील गंभीर होत आहे.