कोलोंबो – श्रीलंकेत 9 मार्च रोजी होणाऱ्या स्थानिक निवडणूका बेमुदत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने शुक्रवारी याबाबतची औपचारिक घोषणा केली आहे. या निवडणुकांच्या नवीन तारखा 3 मार्च रोजी जोहीर करण्यात येतील, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
श्रीलंकेतील आर्थिक स्थिती अजूनही सावरलेली नाही. त्यामुळे स्थानिक निवडणूका मे महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात, असी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय पुढे ढकलल्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकांसाठी आवस्यक असलेला निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी निवडणूक आयोगाचे सदस्य संसदेचे सभापती महिंदा यापा अबेवर्दना यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांनी सबुरीचे धोरण स्विकारले आहे. अध्यक्ष म्हणून आपल्याला प्रथम देशाची आर्थिक घडी नीट बसवायची आहे. आता निवडणुका घेतल्यास देशाच्या आर्थिक स्थितीवर अधिकच ताण पडेल, असे संकेत त्यांनीदिले आहेत. मात्र समागी जन बालावेग्या सारख्या विरोधी पक्षांनी या निर्णयाबद्दल विक्रमसिंघे यांनाच जबाबदार धरले आहे.
#RussiaUkraineWar : पुतिन यांचा आरोप, म्हणाले “युद्धासाठी ‘नाटो’ युक्रेनला अप्रत्यक्षपणे शस्त्रे..”
संतप्त प्रतिक्रिया…
स्थानिक निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर त्याविरोधात जनमानसात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. नॅशनल पीपल्स पार्टी या प्रमुख विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोलोंबोमध्ये मोर्चा काढून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध करण्याचा प्रयत्न देखील केला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर काही नागरिकांनी जोरदार निदर्शने केली असून पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना पांगवले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या. पोलिसांच्या लाठीमारात किमान 15 जण जखमी झाले आहेत.