कोलंबो :– श्रीलंकेतील हवा प्रदुषणात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. यामुळे देशातील बहुतांश शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावली असल्याने संपूर्ण देशातील शाळा शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती आरोग्य आणि पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
आरोग्य सेवा महासंचालक गुणवर्देना म्हणाले, शेजारील भारतात प्रदुषण समस्या वाढत आहे. (Sri Lanka shuts schools as extreme weather brings pollution) परिणामी, बंगालच्या उपसागरातील वादळामुळे अलीकडच्या काही दिवसांत श्रीलंकेत मुसळधार पाऊस पडला. यामुळे राजधानी कोलंबो आणि देशाच्या इतर भागांमध्ये धुके पसरले असून हवेतील सूक्ष्म कणांची पातळी घसरली आहे.
ही स्थिती श्रीलंकेच्या सर्व भागांमध्ये दिसून येत आहे. यामुळे आरोग्य समस्या निर्माण होण्याची भिती आहे. ही स्थिती पुढील दोन आठवडे सुरू राहील. यामुळे बालकांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने देशभरातील शाळा शुक्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय नागरिकांना घराबाहेर पडू नये आणि बाहेर पडताना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.