कोलोंबो – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेला 3 अब्ज डॉलर आर्थिक मदतीचे पॅकेज मंजूर केले आहे. “एक्सटेन्डेड फंड फॅसिलिटी’ अंतर्गत श्रीलंकेला 48 महिन्यांची वाढीव मुदत देखील देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून श्रीलंका प्रचंड आर्थिक संकटात सापडली आहे. या स्थितीमधून बाहेर पडण्यासाठी श्रीलंकेला हे आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. या पॅकेजमधील 333 दशलक्ष डॉलरच्या निधीचे वाटप ताबडतोब करण्यात येणार आहे. नाणेनिधीचे पॅकेज मंजूर झाल्यामुळे अन्य वित्तीय संस्थांकडून वित्तीय सहाय्य मिळवण्याचा मार्ग देखील श्रीलंकेसाठी खुला होणार आहे, असे देखील नाणेनिधीने म्हटले आहे.
श्रीलंकेत प्रचंड महागाई, विदेशी गंगाजळीचे खालावलेले प्रमाण, परतफेडीची शाश्वती नसलेले सार्वजनिक कर्ज आणि वित्तीय क्षेत्रात वाढलेली प्रचंड अस्थिरता यामुळे श्रीलंकेत प्रचंड आर्थिक आणि सामाजिक आव्हाने उभी राहिली आहेत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
श्रीलंकेतील संस्था आणि प्रशासनाच्या रचनेमध्ये प्रचंड सुधारणांची आवश्यकता आहे. या संकटामधून बाहेर पडण्यासाठी श्रीलंकेला “इइएफ’वर आधारलेल्या कार्यक्रमाच्या कालबद्ध अंमलबजावणी आणि सुधारीत रचना होणे गरजेचे आहे.
नाणेनिधीने पॅकेजला मंजूरी दिल्यामुळे नाणेनिधी आणि अन्य वित्तीय संस्थांचे मिळून 7 अब्ज डॉलरचे सहाय्य श्रीलंकेला मिळणार आहे, असे श्रीलंकेचे अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.