ICC World Test Championship : श्रीलंकेने वाढवली Team India ची चिंता

ख्राईस्टचर्च – श्रीलंका व न्यूझीलंड कसोटी रंगतदार स्थितीत आली आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात रविवारी चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 1 बाद 28 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी 257 धावांची गरज आहे. हा सामना श्रीलंकेने जिंकला तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगू शकते.
श्रीलंकेने आपल्या पहिल्या डावात 355 धावा केल्या होत्या. यजमान न्युझीलंडने 373 धावा करत आघाडी घेतली मात्र, श्रीलंकेनेही हार मानली नाही. त्यांनी दुसऱ्या डावात अँजेलो मॅथ्युजच्या शतकाच्या जोरावर 302 धावा करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 285 धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात 1 बाद 28 धावा झाल्या असून त्यांना आता 257 धावांची गरज आहे. खेळ थांबला तेव्हा टॉम लॅथम 11 तर, केन विल्यमसन 7 धावांवर खेळत आहेत.
At stumps on Day 4, New Zealand 28/1 need 257 runs.
Match Centre: https://t.co/FkzUTbHr4y#NZvSL pic.twitter.com/ETVeX87Cwh
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 12, 2023
हा सामना न्यूझीलंडने जिंकला तर भारतीय संघावर त्याचा काही परिणाम होणार नाही. मात्र, हा सामना श्रीलंकेने जिंकला तर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसरा संघ कोण यासाठी भारत व श्रीलंकेत चुरस होणार आहे. सध्या तरी भारतीय संघच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होइल असेच चित्र आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पात्रतेसाठी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अनिर्णित राहिला तरीही भारतीय संघासाठी ते लाभदायक ठरेल. दुसरीकडे श्रीलंकेला केवळ हीच नव्हे तर न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटीही जिंकावी लागणार आहे. या स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी असून त्यांनी अंतिम फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे.
Women’s Premier League | महिला ‘IPL’ बनणार जगातील सर्वात श्रीमंत लीग, बीसीसीआयने तब्बल…
भारतीय संघ 60.29 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेच्या संघाचे 53.33 टक्के गुण आहेत. भारतीय संघाने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर अंतिम फेरीत पोहोचेल आणि श्रीलंका संघ बाहेर पडेल. जर भारताविरुद्धचा चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला किंवा हा सामना अनिर्णित राहीला तरच श्रीलंकेचीही संधी कायम राहणार आहे.





