जीवनगाणे: हात नको ओंजळ पसरा

अरुण गोखले

कोणाकडे काही मागायचे, घ्यायचे झाले तर आपल्याला त्या दात्याकडे हात पुढे करावा लागतो. मात्र संत आणि सद्‌गुरू आपल्याला हेच शिकवतात की “”बाबांनो! काही घ्यायचयं, मागायचयं तर हात पसरू नका ओंजळ पुढे करा.”
आता तुम्हा आम्हाला असं वाटू शकतं की हा असा सांगावा त्यांनी का द्यावा? त्या मागचे कारण काय? तर त्याचं त्यांच्याकडूनच येणारं उत्तर हे असं आहे की, “”बाबांनो! हात पुढे केला काय! आणि ओंजळ पुढे केली काय? दोन्ही कृतींमागचा हेतू जरी एकच असला तरी त्यात फरक आहे. नीट लक्षात घ्या, जेव्हा एखादा भिकारी तुमच्याकडे भीक मागतो. त्यावेळी तो त्याचा हात पुढे करतो, ओंजळ नाही. त्या हात पुढे करण्यात, कोणापुढे हात पसरण्यात एक प्रकारची लाचारी असते. आपल्यातल्या उणिवेची, कमतरतेची, कोतेपणाची बोच असते.

त्याच्या उलट जेव्हा एखादा साधू बैरागी हा तुमच्याकडे भिक्षा मागतो त्यावेळी तो तुमच्यापुढे हात पसरत नाही तर तो त्याची झोळी किंवा ओंजळ पसरतो. त्या मागणीत लाचारी नाही तर उलट दुसऱ्याला दातृत्वाची जाणीव करुन देण्याची उदात्त भावना असते. भिकारी हा झोळी भरलेली असली तरी आणखी भीक मागतच असतो, पण साधू बैरागी अन्‌ खरे संन्यासी हे संग्रहासाठी नाही तर केवळ भूक भागावी म्हणून ओंजळ पुढे करतात. त्यात किती आणि काय मिळालंय ह्याचा विचार नसतो.

आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. जे हातावर पडते, ते फार काळ टिकत नाही. पण जे ओंजळीत मिळते ते सांडत नाही, पडत नाही. हातावर ठेवलेला पैसा, वस्तू ही पडते, सांडते. पण ओंजळीत घातलेलं ज्ञान कायम साठवले जाते. ओंजळीतली फुलं सुगंध देतात. हातांनी केलेल्या पापाचे क्षालन करण्यासाठी क्षमेची ओंजळच पसरावी लागते. पुण्याईच दान पदरात घेताना हात नाही तर ओंजळच पसरावी लागते.

ओंजळ पसरण्यात लिनता आहे, विनय आहे, नम्रता आहे. वरदान काय किंवा प्रसाद काय हा ओंजळीत घ्यायचा असतो. हात हा कोणापुढेही पसरला जातो, पण ओंजळ ही जो खऱ्या अर्थाने परिपूर्ण दाता आहे, त्याच्याकडेच ज्ञानासाठी, कृपाप्रसादासाठी, वरदानासाठी पसरली जाते. हात हा स्वार्थासाठी किंवा फक्‍त स्वत:साठी पुढे केला जातो. तर ओंजळ ही आपल्या बरोबरच इतरांच्या कल्याणासाठी पसरली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.