भिगवण – करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने अकोले परिसरात औषध फवारणी करण्यात आली.अकोले परिसरात वायसेवाडी, धायगुडेवाडी, दराडे वस्ती, गायकवाड वस्ती, आदी छोट्या वस्त्यांवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने औषध फवारणी करण्यात आल्याने लोकांमध्ये जरा करोनाच्या भीतीपासून दिलासा मिळाला.
यासाठी आरोग्यसेवक जीवन चांदगुडे, ज्ञानदेव दराडे, कमलाकांत वणवे, वसंत शिंदे, पोलीस पाटील सतीश सुबनावळ, नवनाथ वाघ यांनी सहकार्य केले. मागील चार पाच दिवसांपासून अकोले परिसरात पुणे आणि बाहेर गावांतून आलेले नागरिक यांच्या नावाची नोंदणी ग्रामप्रशासनाने करून घेतली आहे.
यामध्ये कोणाला करोना विषाणू संदर्भात लक्षणांचा त्रास जाणवू लागल्यास आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना तातडीने कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी तलाठी महादेव भारती, ग्रामसेवक सचिन पवार, आरोग्यसेवक जीवन चांदगुडे पोलीस पाटील सतीश सुबनावळ यांच्या पथकाने त्यांची नाव नोंदणी करून घरामध्येच राहण्याची सूचना केली आहे.