आमचं नव्हे, शिवसेनेचं सरकार

पृथ्वीराज चव्हाण यांची कथित ऑडिओ क्‍लिप व्हायरल

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची एक कथित ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली असल्याने एकच राजकीय खळबळ उडाली आहे.

या ऑडिओ क्‍लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याचे सांगत आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, या ऑडिओ क्‍लिपवर अद्याप पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

स्थानिक भागासाठी निधीच्या अपेक्षेने एका कार्यकर्त्याने पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला होता. यावेळी पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत की, मी काही आज मंत्रिमंडळात नाही. आमचं सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. मी शिफारस करेन. पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे होईल असे वाटत नाही.

यावर समोरील कार्यकर्ता निधी उपलब्ध आहे. आयुक्‍तांकडे ट्रान्सफर केला आहे, असे सांगतो. त्यावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व निधी परत मागविण्यात आला आहे. नव्याने घ्यावं लागेल, असे सांगतात.

यावर लोकांची परिस्थिती बिकट आहे, चार जणांनी आत्महत्या केली आहे, असे समोरील कार्यकर्ता सांगतो. तेव्हा “मी शिफारस करतो सांगितले आहे. मी मंत्रिमंडळात नाही’ असा पुनरुच्चार पृथ्वीराज चव्हाण करतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.