भारताचा लांब उडी प्रकारातील अव्वल खेळाडू मुरली श्रीशंकर याने बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रजतपदक पटकावले. मात्र, त्याच्या सुवर्णपदकात व रजतपदकात वरील या छायाचित्रात दाखवला आहे तितकाच फरक आहे. या एका फाऊलमुळे त्याच्या पदकाचा रंग बदलला.
जागतिक क्रीडा क्षेत्रात सध्या जे भारतीय खेळाडू खेळत आहेत, त्यांच्याकडे गुणवत्ता अफाट आहे, परंतु काय केले की चूक होणार नाही याकडे खेळाडूंपेक्षा त्यांचे प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफनेच जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. मुरली श्रीशंकरने एकूण केलेल्या प्रयत्नांना दाद तर द्यावीशी वाटतेच, परंतु त्याच्या जिद्दीलाही सलाम करायला हवा. श्रीशंकर याने पहिल्या काही प्रयत्नात आलेल्या अपयशातून भरारी घेतली व ऐतिहासिक कामगिरी करताना रजतपदकावर नाव कोरले.
पुरुषांच्या लांब उडी प्रकारात 8.08 मीटर अंतर नोंदवत ही लक्षवेधी कामगिरी घडली. त्याने सहाव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली हे खरोखर अविश्वसनीय आहे यात शंका नाही. या स्पर्धेत श्रीशंकरने चौथ्या प्रयत्नात 8 मीटरची मारलेली लांब उडी नियमबाह्य ठरवण्यात आली. त्याने चौथ्या प्रयत्नात 8 मीटरपेक्षाही जास्त लांब उडी मारली होती. मात्र, लॅंडिंग बोर्डवर 1 सेंटिमीटरचा फरक असल्याचे रेफ्रींनी सांगितले व हा प्रयत्न फाऊल ठरवला गेला. या छायाचित्रात पाहिल्यावर समजते की संधी कशी हुकते. अर्थात पाचव्या प्रयत्नामध्ये त्याने ही कसर भरून काढली, पण त्याला सुवर्णपदकाच्या जागी रजतपदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेपूर्वी झालेल्या एका स्पर्धेत त्याने 8.36 मीटर अशी वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली होती. राष्ट्रकुलमध्ये मात्र त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. श्रीशंकरच्या या घटनेवरून फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांच्या हुकलेल्या पदकाची आठवण झाली.
धावताना बरोबरचा स्पर्धक किती पुढे आला आहे हे पाहण्यासाठी मिल्खा सिंग मागे वळले व त्या निमिशार्धात स्पर्धक त्यांच्यापुढे गेला व त्यांचे पदक हुकले. पायोली एक्स्प्रेस पी. टी. उषाचेही पदक असेच अवघ्या काही सेकंदांनी हुकले होते याचेही स्मरण झाले. यातून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या खेळाडूंनी या अशा चुका टाळल्या किंवा त्या होऊ नयेत यासाठी सरावात जास्त भर दिला तर येत्या काळात क्लब दर्जाच्याच नव्हे तर ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्येही आपण बाजी मारू.