पुणे – फेडरल रिझव्हने गेल्या काही आठवड्यामध्ये दोन टप्प्यात व्याजदरात तब्बल दीड टक्के वाढ केल्यामुळे शेअर बाजाराबरोबरच सोन्याच्या दरावर नकारात्मक परिणाम झाला आहे. आता पुन्हा या आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा सोन्याच्या दरावर नकारात्मक परिणाम होणे अपेक्षित आहे.
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीमुळे गेल्यास पाच आठवड्यापासून सोन्याचे दर आठवड्याच्या पातळीवर कमी होत आहेत.
आता वायदे बाजारात ऑगस्टमधील सोन्याचे दरही कमी पातळीवर रेंगाळत आहेत. अमेरिकेमध्ये महागाई 41 वर्षाच्या उच्चांकावर असल्यामुळे महागाई रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत.
आक्रमक व्याजदरवाढीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये डॉलरचे मूल्य वीस वर्षाच्या उच्चांकावर गेले होते. त्यामध्ये आता काहीशी घट झाली असली तरी पुन्हा फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर डॉलर वधारणार आहे. म्हणजेच त्याचा सोन्याच्या दरावर परिणाम होणार आहे.
भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर याचा भारतीय शेअर बाजारावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मात्र भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक अगोदरच फार घसरले असल्यामुळे नव्या व्याजदर वाढीचा निर्देशांकावर किती परिणाम होईल याबद्दल शंका आहे. या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक अमेरीकेत व्याजदर वाढ होणार असूनही वाढले आहेत.
मात्र जागतिक पातळीवर आता महागाई वाढत असल्यामुळे मंदीची भाषा बोलली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉलर पुन्हा भाव खाण्याची शक्यता वाढली आहे. व्याजदर वाढीबरोबरच फेडरल रिझर्व्हने जर भविष्याबाबत नकारात्मक व्यक्तव्य केले तर त्याचा सोन्याच्या दरावर आणखी परिणाम होऊ शकतो.
मात्र काही विश्लेषकांना वाटते की, मंदी रोखण्यासाठी रिझर्व्ह संतुलित भूमिका घेऊ शकते. अशा परिस्थितीत आता व्याजदरात वाढ केली तरी आगामी काळामध्ये मंदी कमी करण्यासाठी फेडरल रिझर्व्ह आक्रमक व्याजदर वाढ करणार नाही असे अनेकांना वाटते.