बारामतीमध्ये अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे कृषकच्या प्रदर्शन
बारामती – तीन फूट उंचीची पोंगनूर गाय, दोन फूट उंचीची काश्मिरी शेळी, बेंटम शेळी, सानियन शेळी, १५० किलो वजनाची तुरकी दुंबा मेंढी आणि सोन्या-मोन्या मुका देणारी बैलजोडी प्रदर्शऩाचे आकर्षण ठरले. तसेच, तर ६०० ते ७०० रुपये लिटर दराने दूध विक्री होणारी खिलार कपिला गाय शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरली. कपिला वळूबरोबर छायाचित्र काढण्यासाठी शेतकरी, नागरिकांनी गर्दी केली होती.अवघी दोन फूट उंचीची काश्मिरी शेळीबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती.
बारामतीमध्ये अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित कृषकच्या प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनामध्ये काजळी खिल्लार बैलजोडी, ब्लॅक अॅस्टोलॉर्म, वनराजा, कावेरी, कडकनाथ देशी कोंबड्या, बटेर लाव्ही, बोअर शेळी, नारी सुवर्णा मेंढी, मुर्हा म्हैस, गीर, सहिवाल, जर्शी, देवणी, खिल्लार, कपिला गायी, लाल खंदारी, वळू आदी जनावरे शेतकऱ्यांनी जवळून अनुभवली.
सांगोला येथील बिरा पांडुरंग सरगर यांनी खिलार कपिला वळू आणि गाय प्रदर्शनात आणली होती. सरगर म्हणाले की, कपिला गाय ५ ते ६ लिटर दूध देते. गायीच्या दुधाची ६०० ते ७०० रुपये लिटर दराने विक्री होते, तर या गायीच्या दुधापासून बनविलेल्या तुपाची १० हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होते. या दुधाचा कॅन्सरच्या रुग्णांना फायदा होतो, असा दावादेखील सरगर यांनी केला. या गायीचे गोमूत्र रोज सकाळी एक कप घेतल्यास मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारावर उपयोग होतो, असे त्यांनी सांगितले.
बारामती येथील शाकीब बागवान म्हणाले की, काश्मिरी शेळीचे वजन ५० ते ६० किलोपर्यंत वाढते. अनेक जण ‘शो’साठी या शेळीचे पालन करतात. ही शेळी अर्धा लिटर दूध देते. दुधाची ४०० रुपये लिटर किंमत आहे. शेळीच्या पिलाचीच १५ हजार, तर पूर्ण वाढ झालेल्या बोकडाची किंमत ७० हजार रुपयांपर्यंत मिळते. या शेळीपालनात कमी जागेत अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. तुरकी दुंबा ही मेंढीचे वजन १०० ते १५० किलोग्रॅमपर्यंत वाढते. बकरी ईदला याला दीड ते दोन लाख रुपये किंमत मिळते, असे त्यांनी सांगितले.
उदयनराजेंनी प्रदर्शऩाला दिली भेट
यंदा भीमथडी जातीचे ६० हून अधिक अश्व प्रदर्शनात सहभागी झाले होते. मारवारी जातीच्या अश्वांचे प्रदर्शनदेखील पाहण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
खाद्य पदार्थांची रेलचेल
कृषिकच्या खाऊ गल्लीत विविध खाद्यपदार्थाची रेलचेल होती. यामध्ये खवय्याकडून मासवडी, थापेवडी, कढी भात, हैदराबादी टोस्ट, पिठलं भाकरी, ज्वारीची इडली, डोसा, राशीनची शिपी आमटी, सोलापुरी वडा, स्वीटकॉर्न भजी, थालिपीठ, गुळाचा पेढा आदी पदार्थांवर ताव मारल्याचे चित्र होते. बहुतांशी पदार्थांचे महिला बचत गटांनी स्टॉल लावले होते.