जिह्ल्यात गांडूळ खत निर्मितीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पदाधिकाऱ्यांना मात्र गंध नाही

दुष्काळावर राजकीय नारेबाजी करणारे झेडपीचे पदाधिकारी काही योजनांविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा फलटण तर उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या जावलीत, कृषी सभापती मनोज पवार यांच्या खंडाळ्यात तर आमदार मकरंद पाटील यांच्या वाई विधानसभा मतदार संघात या प्रकल्पांना गती मिळालेली नाही. फलटण खंडाळा व जावळी अवघी दहा टन गांडूळ खत निर्मिती झाली आहे. सातारा व कराड तालुक्‍याने मात्र 131 टन खतनिर्मितीचा विक्रम नोंदवला आहे. बावीस लाखाच्या महसूलात 76 टक्के वाटा या दोन तालुक्‍यांचा असून खत विक्रीतून यांना साडेसोळा लाख रुपये मिळाले. घनकचरा व्यवस्थापनानंतर कैलास शिंदे यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्राकडे आता लक्ष वळविले आहे.

सातारा  – आयएसओ मानांकन घेतलेल्या सातारा जिल्हा परिषदेने महसूल वृद्धीचा चांगला कित्ता गिरवला आहे. घनकचरा व्यवस्थापना अंर्तगत निर्माण झालेल्या 168 टन तयार झालेल्या खताचे जिल्हा परिषदेला बावीस लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या गावातच मात्र गांडूळ खत निर्मितीची जाणीव नसल्याचे उलट चित्र पाहावयास मिळत आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्ह्यात तब्बल 223 ग्रामपंचायतीमध्ये गांडूळ खत निर्मितीला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

या खत निर्मितीच्या प्रकल्पांसाठी सातारा जिल्हा परिषदेने स्वतंत्र पथकांची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे 223 गावांपैकी 186 गावांचे प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरीत 37 गावांपैकी 26 गावांमध्ये खत प्रकल्प जवळपास अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात गांडूळ खताची 168 टन निर्मिती झाली असून शेतकऱ्यांना झालेल्या विक्रीतून झेडपीला बावीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापना अंर्तगत गांडूळ खत निर्मितीचे काम 96.33 टक्के झाल्याचे सांगण्यात आले असून पुणे विभागात या निमित्ताने 98 टक्के कामांचा डंका एकट्या सातारा जिल्ह्याचा आहे. कराडमध्ये 55 तर साताऱ्यात 24 ग्रामपंचायतीनी हे काम केले आहे. कराड तालुक्‍यात 60 टन तर सातारा तालुक्‍यात 71 टन खत निर्माण झाले आहे. शहरापेक्षा साताऱ्याच्या ग्रामीण भागात गांडूळ खताचा ट्रेंड निर्माण होऊ लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.