श्री क्षेत्र महाबळेश्‍वर अस्वच्छतेच्या विळख्यात

स्वच्छतागृहातील अस्वच्छता आणि पाण्याची सोय नसल्याने स्थानिक, पर्यटकांची नाराजी
पाचगणी –
एकीकडे संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबवत शहरेच्या शहरे नव्या जोमाने कामाला लागली आहेत. त्याचबरोबर राज्य शासन, केंद्र सरकारही यासाठी करोडो रुपये खर्च करत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र महाबळेश्‍वर पर्यटन स्थळाचे प्रमुख आकर्षण केंद्र असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे मात्र याउलट चित्र पाहावयास मिळत असून असणारे एकमेव स्वच्छतागृह समस्यांच्या विळख्यात सापडले असून महिला पर्यटक मात्र स्वच्छतागृहातील अस्वच्छता आणि पाण्याची सोय नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लाखो भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे वर्षभर भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते. जेमतेम एक हजारच्या घरात असणारी लोकसंख्या आणि रोज सुमारे 15 ते 20 हजार भाविक व पर्यटक या क्षेत्राला भेट देतात वर्षभरात सरासरी 18 ते 22 लाख फ्लोटिंग पॅप्युलेशन असून हक्क गाजवण्याचे काम देवस्थान ट्रस्ट करते तर येणाऱ्या भाविकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायत करते. श्रावण महिन्यात तर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते. देणग्या व इतर रूपाने देवस्थानला दरवर्षी लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळते. अनेक श्रीमंत भाविक क्षेत्र महाबळेश्‍वर विविध वस्तू व हजारो रुपये अर्पण करतात. आजमितीला देवस्थानच्या खात्यात कोट्यावधींचा निधी पडून आहे. अधिक उत्पन्न वाढावे, यासाठी देवस्थानच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्या तुलनेत येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देवस्थान समितीच्या माध्यमातून नेमक्‍या कोणत्या व काय काय सुविधा मिळतात? हा खरा प्रश्‍न निर्माण होत आहे.

क्षेत्र महाबळेश्‍वर येथे आजही अनेक प्राथमिक सुविधांची वानवा असून प्रामुख्याने यामध्ये स्वच्छतागृहाची प्रमुख समस्या आहे. देवस्थानचे एकमेव स्वच्छतागृह येथे येणाऱ्या पर्यटकाना सुविधा देते परंतु हे असणारे स्वच्छतागृह समस्येच्या गर्तेत अडकले आहे. अस्वच्छता आणि पाणीच नसल्याने ते असून अडचण आणि नसून खोळंबा ठरत आहेत. स्वच्छतागृहाच्या या दुरवस्थेने महिला पर्यटकाना याचा फटका बसत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या महिला पर्यटक व भाविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांना अजून स्वच्छतागृहांची आवश्‍यकता असून त्यादृष्टीने मंदिर प्रशासन समितीने पावले उचलण्याची गरज आहे.

येथे येणाऱ्या पर्यंटकाना सुविधा मिळणे आवश्‍यक असून जिल्हाधिकारी यांनी “क’ पर्यटन मधून या गंभीर प्रश्‍नासंदर्भात लक्ष घालून ग्रामपंचायतीस दोन शौचालय युनिट मंजूर केली असून त्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे पर्यटक व भाविकांची सोय होईल.

-सारिका वाडेकर सरपंच

Leave A Reply

Your email address will not be published.