मंगल कार्यालयांपुढे वाहतूक कोंडीचे “विघ्न’!

“ट्रॅफिक’चं घोडं आडलं : पुणे-मुंबई महामार्गालगत पार्किंग समस्येतून “वाट’ सापडेना
वडगाव मावळ – देहुरोड ते लोणावळा दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या लॉन्स व मंगल कार्यालयाच्या विवाह समारंभ वऱ्हाडींसह वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. नवरदेवाची मिरवणुकीमुळे “ट्रॅफिक’चे दुखणे पिच्छा सोडत नाही. याशिवाय वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.

मावळ तालुक्‍यात सामुदायिक विवाह सोहळा संस्कृती प्रभावीपणे रुजली आहे. मात्र तरीही काही कार्यामध्ये “श्रीमंती’चा थाट दिसतो. अनेकदा विवाह समारंभ लॉन्स आणि मंगल कार्यालयात करणे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. कोणाच्या लग्नात किती वाहने होती, यावर विवाहाची भव्यता कळते. मावळ तालुक्‍यात विवाहासाठी लॉन्स व मंगल कार्यालय मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. काही कार्यालयाला पार्किंग व्यवस्था नसल्याने महामार्गाच्या दुतर्फा लांबलचक रांगा लागलेल्या असतात. त्यात महामार्गावरून डीजे व डॉल्बीच्या आवाजात नवरदेवाची मिरवणूक सुरू असते. महामार्गावरून सुरू असलेल्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

नवरदेवाच्या मिरवणुकीत नाचणारे युवक बेधुंद अवस्थेत असल्याने त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केल्यास हाणामारीच्या घटना घडतात. नेते व पदाधिकारी यांना अनेक विवाहाना जाण्याची गडबड असल्याने त्यांची वाहने तसेच विवाह अटोपल्यानंतर सर्वांना घरी जाण्याची घाई असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने “नो एन्ट्री’मध्ये गेल्याने कोंडीत भर पडते. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने जखमी व रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगल कार्यालयात पार्किंग व्यवस्था करण्यात यावी, तसेच मिरवणूक ही कार्यालयाच्या आवारात काढण्यात यावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक
करीत आहेत.

महामार्गालगतच्या ज्या मंगल कार्यालयांमुळे वाहतूक कोंडी होते, त्या लॉन्स व मंगल कार्यालयावर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी एकट्यासाठी चारचाकी वाहनांचा उपयोग ना करता अनेकांनी एकच वाहन वापरले, तर वाहतूक कोंडी कमी होईल. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यावर वाहतूक कोंडी थांबेल.

– ज्ञानेश्‍वर शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.