“ऑटोमेटेड तिकीट चेकिंग ऍन्ड मॅनेजिंग ऍक्सेस’ या स्वयंचलित यंत्रणेद्वारे होणार तपासणी
मध्य रेल्वेच्या चार विभागांसाठी यंत्रणा प्रस्तावित
पुणे – रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची तिकीट तपासणी आणि तापमान मोजण्याचे काम येत्या काळात “आत्मा’ करणार आहे. नागपूर पाठोपाठ मध्य रेल्वेकडून उर्वरित विभागांमध्ये “ऑटोमेटेड तिकीट चेकींग ऍन्ड मॅनेजिंग ऍक्सेस’ (एटीएमए) ही स्वयंचलित यंत्रणा बसवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. रेल्वे स्थानकांवरील प्रवासी आणि अधिकारी यांच्यातील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
भारतीय रेल्वेकडून लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार, विद्यार्थी आदींना मूळगावी सोडण्यासाठी श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. याशिवाय 1 जूनपासून विविध भागांतून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवासी स्थानकाच्या आवारात आल्यानंतर, सध्या कर्मचारी “थर्मल स्क्रिनिंग’ करण्यात येत आहे. केवळ “कन्फर्म’ तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश देण्यात येत आहे.
मात्र, यामध्ये कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये संपर्क येत आहे. हा संपर्क कमी करण्यासाठी रेल्वेने तंत्रज्ञानाची जोड घेतली आहे. “ऑटोमेटेड तिकीट चेकींग ऍन्ड मॅनेजिंग ऍक्सेस’ (आत्मा) ही यंत्रणा प्रवाशांचे तापमान, मास्क, तिकीट आणि ओळखपत्र तपासणार आहे. नागपूर विभागामध्ये पहिल्यांदा ही यंत्रणा बसवली. मध्य रेल्वेकडून पुणे, मुंबई, भुसावळ आणि सोलापूर या विभागांमध्ये ही यंत्रणा प्रस्तावित आहे. या ठिकाणी रेल्वेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
पुणे विभागामध्ये “आत्मा’ची यंत्रणा बसवण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.
काय आहे “आत्मा’
“आत्मा’ही एटीएमसारखी यंत्रणा रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये लावण्यात येणार आहे. या यंत्रणेला एक “डिजिटल स्क्रीन’ असून, प्रवाशांना एका ठिकाणी उभी राहून तपासणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तापमानाची तपासणी होणार आहे. या यंत्रणेच्या “डिस्प्ले’वर असणारा तपशील रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणीच्या संगणकावर दिसणार आहे. तर तिकीट आणि ओळखपत्राची तपासणी कॅमेरा आणि स्पीकरद्वारे होणार आहे.