पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांच्या सोयीसाठी मोशीमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. मोशी येथील गायरान जमिनीवर 15 एकर परिसरामध्ये 8 मजली इमारत उभी करण्यात येणार आहे. रूग्णालयासाठी 6 जणांनी निविदा भरली होती. यामध्ये तीन अपात्र तर तीन पात्र झाले आहेत.
शहरात 700 खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह जिजामाता रूग्णालय, थेरगाव रूग्णालय, आकुर्डी आणि भोसरी अशी मोठी रूग्णालये आहेत. याशिवाय आठ प्रसुतीगृहे, 28 दवाखाने, झोपडपट्ट्यांमध्ये 20 आरोग्य केंद्र आहेत. 8 कुटुंब नियोजन केंद्र, 38 लसीकरण केंद्र आहेत. यामार्फत रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते. ही सर्वच रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड, चाकण, आंबेगाव व जुन्नर या भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल होत असतात. त्यामुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी येत्या काळात मोशीत 850 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. 25 एप्रिल, 2023 ला निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये सहा ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. यामध्ये तीन अपात्र तर तीन पात्र झाले आहेत. यामधील दोघांनी 15 ते 20 टक्के वाढीव दराने तर एका ठेकेदाराने 9 टक्के वाढीव दराने निविदा भरली आहे. 9 टक्के वाढीव निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला काम देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. असे असले तरी संबंधित ठेकेदाराला आणखी दर कमी करण्यासाठी पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर या विषयाला स्थायी समितीमध्ये मंजुरी दिल्यानंतर पुढील दिड महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरूवात होण्याचा अंदाज आहे.
असे असेल रूग्णालय
तळमजला ओपीडी व जनरल मेडिसिन विभाग असेल. तसेच, कान-नाक-घसा, नेत्र विभाग असेल. तसेच, सीटी स्कॅन व एमआरआयची सुविधा असेल., पहिला मजला रेडिओलॉजी, डे केअर विभाग, सोनोग्राफी, पेडियाट्रिक, सायकॅट्रिक, त्वचारोग, स्त्रीरोग व श्वसन नलिकांचे आजार यासंबंधित ओपीडी असेल., दुसरा मजला सर्जरी विभाग, भाजलेले रुग्ण, – डायलिसिस, पॅथॉलॉजी विभाग असणार आहे. तसेच, रक्तपेढी व 180 आसन क्षमतेचे कॅन्टीन असणार आहे., तिसरा मजला तिसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर व आयसीयू कॉम्पलेक्स असणार आहे. त्यामध्ये पीआयसीआय, एनआयसीयू असतील., चौथा मजला जनरल मेडिसिन व नेत्र रुग्ण – वॉर्ड असेल., पाचवा मजला जनरल सर्जरी, कान-नाक- घसा वॉर्ड असेल., सहावा मजला बालरोग वॉर्ड असेल., सातवा मजला अस्थिरोग, स्त्री रोग, त्वचारोग व मानसिक रुग्णांचे वॉर्ड असतील., आठवा मजला या मजल्यावर स्टाफ क्वार्टर, स्पेशल 14 रूम व स्टाफसाठी 180 क्षमतेचे कॅन्टीन असणार आहे.
सुसज्ज वाहन पार्किंग
बेसमेंट आणि तळमजला सोडून आठमजली इमारत असणार आहे. बेसमेंटमध्ये पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. त्यामध्ये 274 चारचाकी व 250 दुचाकी वाहनांची पार्किंग असणार आहे.
मोशी येथील नवीन रुग्णालयासाठी 6 जणांनी निविदा भरली होती. यामध्ये तीन अपात्र तर तीन पात्र झाले आहेत. दोघांनी 15 ते 20 टक्के वाढीव दराने तर एका ठेकेदाराने 9 टक्के वाढीव दराने निविदा भरली आहे. 9 टक्के वाढीव निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला दर कमी करण्यासाठी पत्र देण्यात येणार आहे.
– प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता.