करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही
तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये “शीघ्र प्रतिसाद कक्ष’ सुरू
बारामती (प्रतिनिधी) -बारामतीत एकही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तसेच येथील उपजिल्हा रुग्णालय मार्फत एक स्पेशल वॉर्ड तयार केला असून कोणत्याही परिस्थितीसोबत मुकाबला करण्यास तयार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालय येथे “शीघ्र प्रतिसाद’ कक्ष सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती पंचायत समिती, बारामतीच्या आरोग्य विभागामार्फत बारामती तालुक्यातील नागरिकांसाठी करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीमार्फत मिळत असल्याने या विभागांतील अधिकारीवर्गास त्याबाबत माहिती देण्यासाठी बारामती येथे सोमवारी (दि. 16) डॉ. मनोज खोमणे यांनी बैठक घेतली, त्यावेळी वरील माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, बारामती तालुक्यात करोना रूग्ण शोध मोहिम राबविणे, परदेशी प्रवास केलेल्या नागरिकांचा व सहवासितांचा शोध आरोग्य कर्मचारी मार्फत सुरू आहे. आवश्यकते प्रमाणे प्रवासी यांची तपासणी वैद्यकीय अधिकारी मार्फत केली जात असून गरज असल्यास पुणे येथील नायडू हॉस्पिटल, पुणे येथे केल्या जातील.
तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळा आयोजित करून त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.सर्व पंचतारांकीत हॉटेल व्यवसायिकांना परदेशी प्रवासी आल्यास त्वरीत आरोग्य विभागास कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तीव्र ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास अडचण, निमोनिया सदृश्य स्थिती, परदेश प्रवास अथवा परदेशी प्रवासी यांचा सहवास आदी करोना बाबतची लक्षणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती एमआयडीसीत घेतली खबरदारी -कुंभार
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बारामती एमआयडीसीमध्ये करण्यात येत आहे. तसेच करोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याविषयी कामगारांच्या जनजागृती केली जात असल्याचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 16) जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत कौन्सिल हॉल येथे बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व संजीव देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते. बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे तसेच कार्याध्यक्ष दत्ता कुंभार हेदेखील बैठकीस उपस्थित होते.